Thursday, 11 January 2018

सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकांतील अर्पण पत्रिका

सुहास शिरवळकरांच्या पुस्तकांतील अर्पणपत्रिका:

१.प्रतिकार -
मुझे इंतजार है-
बलात्काराच्या बातम्या होणार नाहीत
चर्चा होणार नाही
अशा दुर्दैवी तरूणीकडे वाईट
संशयी नजरेनं पाहिलं जाणार नाही
स्त्रीच्या असहाय्यतेचा
गैरफायदा घेतला जाणार नाही
शरमेनं समाज मान खाली घालेल
आणि ,
एक तरी तरूण स्वीकारण्यासाठी
हात पुढे करेल
कलम नंबर शंभरचा खरा अर्थ
मनामनांतून रूजेल,
त्याचे उद्घोष होतील
वो सुबह कभी तो आएगी!
२. क्रमशः -
ही कादंबरी लिहण्यास मला प्रवृत्त केल्याबद्दल, मी 'श्री' साप्ताहिक मुंबई यांचा व ही कादंबरी "अक्षरयात्रा" पुरवणीत क्रमशः प्रसिद्ध केल्याबद्दल मी "तरूण भारत" बेळगाव यांचा आभारी आहे. सदर कादंबरीसाठी मला डॉ. विजय गोखले पूणे यांनी वैद्यकिय माहिती पुरविली. पोलिस खात्यासंबंधीची माहिती श्री. संजय भोसले, कमिशनर अॉफिस पूणे ह्यांनी दिली. सहकार्याबद्दल मी दोघांचाही ऋणी आहे.
सुहास शिरवळकर
३. कळप -
पिवळ्या कळपातील बादनाम बदनसीब व आयुष्यभर आर्थिक मानसिक गुलामगिरीतून मुक्ती न लाभलेल्या दुर्दैवी कलाकारांना... कळप आणि ,
दहशतीविरोधात प्रतिकार करताना प्रसंगी प्राणांची बाजी हारूनही देशाचं स्वातंत्र्य मुक्त राखणा-या शूर, देशभक्त जवानांना 'वर्चस्व' अर्पण
-सुहास शिरवळकर
४. तुकडा तुकडा चंंद्र -
माझ्या वाचकांना-
सुहास शिरवळकर
५. लटकंती -
चि. सम्राट व चि. सन्मित्रच्या लुटूपुटूच्या 'प्लँचेटला' ज्यानं मला लटकंतीची प्रेरणा दिली.
-बाबा
६. तलखी -
सर्व कलाकारांना, ज्यांना आपण कोठे आहोत याची जाणीव असते आणि आपली कला दुय्यम न मानता जे तिच्यावर मनापासून प्रेम करतात.
७. दास्तान -
यू तो हर लम्हा एक बहानाहै
दिल के रोने को, ऐ दोस्त!
रंज है तो सिर्फ इस बात का
के हर कोई अपनी ही
किसी बात पे रोता है!
जब किसी गैर की खातिर
छलकती है आँखे-
वही से एक दर्दभरी
दास्ताँ शुरू होती है!
८. समांतर -
मित्रवर्य श्री.प्रभाकर भडसावळे
ह्यांच्याबरोबरील गप्पांच्या रात्रीस
९. अनुभव -
विस्मयमालांमधून पूर्वी प्रसिद्ध झालेल्या रहस्यकथांच्या द्वितीयावृत्ती प्रकाशित करायला लावणाऱ्या 'विस्मय'प्रेमी वाचकांना-
सुहास शिरवळकर
१०. बंदिस्त -
स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक ओळखून मगच माणूस म्हणून मुक्त जीवन जगणाऱ्या विचारी स्त्रीयांना....
लेखक

११. क्षितिज -
ख्वाबों के सितारों की रोशनी के नाम-
जो स्ट्रगलिंग पिरियड में कलाकार को जिन्दा रखती है!
१२. सूत्रबध्द
मधुसुदन नायर व
बेहराम मेहता
या 'मालिका' मित्रांना
-सुहास शिरवळकर
१३.वास्तविक -
आयुष्यातून एक एक माणूस
गळत जाणं, किंवा
एक एक माणसानं आपल्याला
वजा करत जाणं...
शेवटी स्वतःसाठीची एक
शून्य पोकळी, अन् त्या पोकळीत
स्वतःचाच शोध घेत
पाकोळीच्या अस्थिरतेने
अखेरच्या श्वासापर्यंत
भिरभिरत राहाणं...
म्हणजेच अंतिम वास्तव असेल का ?
- सुहास शिरवळकर
१४. मधुचंद्र -
नूरजहाँ, सुरैय्या, वहिदा,
वैजयंतीमाला, मधुबाला, नूतन...
ते, माधुरी, श्रीदेवी, रेखा...
ते, ऐश्वर्या, राणी मुखर्जी,
प्रीती झिंटा, करिश्मा, काजोल..
-दर बदलत्या पिढीनुसार
पैकी कोणा ना कोणा अभिनेत्रीला
हृदय-सिंहासनावर स्थापित करूनही
वास्तवाचे भान ठेवून,
तितक्याच उत्कट प्रेमाने
आपापले संसार सांभाळणा-या
दर तरूण पिढीतील असंख्य तरूणांना!
- सुहास शिरवळकर
१५. झूम -
खानदानी मद्याचा आस्वाद घेत,
त्याचा आकंठ उपभोग घेणं,
आणि...
खानदानी धुळीस मिळवत,
मद्याने आपल्याला वापरणं
यातली पुसट सीमा-रेषा ओळखून
वेळीच थांबू शकत असशील, तर
तुलाच....
- सु. शि.
१६. अंमल -
भूतयोनी अस्तित्वात आहे का नाही
श्रध्दा - अंधश्रध्दा....
असल्या भंपक काथ्याकूटात अडकून न राहता
भूतकथा वाचून मरणाचं घाबरायला आवडतं
या कथांमधलं वातावरण रसिकतेने उपभोगता येतं
अशा सर्व दर्दी वाचकांना
- सुहास शिरवळकर
१७. अखेर -
'कॅम्पस', 'चुनौती' इ. मालिकांचे सुप्रसिद्ध कॅमेरामन व प्रिय मित्र श्री भारत नेरकर यांना
- सुहास शिरवळकर
१८. लूपहोल -
पृथ्वीवर शेवटची तीन माणसं अस्तित्वात असतील तेव्हाही, दर दोघं एकाला वगळून आपापली रहस्यं निर्माण करतील ती जपून दुसऱ्या गटाची रहस्य उकलण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करतील! कारण रहस्यनिर्मिती आणि रहस्यभेद या मूलभूत प्रवृत्ती आहेत. मृत्यूच्या फेऱ्याप्रमाणेच, या प्रवृत्तीपासूनही, मनुष्यमात्राची सुटका केवळ अशक्य आहे.
"-मी"
१९.स्पेलबाउंड -
आपल्या अंगी असणाऱ्या कोणत्याही प्रकट व सुप्त शक्तीचा समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी सकल लोककल्याणासाठी वापर करण्याची प्रवृत्ती इच्छा आणि कृती असणाऱ्या कोणाही सामान्य / असामान्य मानवाला-
-सुहास शिरवळकर
२०. ओ गॉड -
'स्व'ची ओळख शोधण्यात मग्न असणाऱ्या, 'स्व' अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ अनुभवणा-या स्वतंत्र पुरोगामी तरूणींना-
- सुहास शिरवळकर

२१. हमखास -
श्री. शशिकांत अ. ठाकूर सर...
मुख्याध्यापक म्हणून हिराराल सराफ प्रशालेतून निवृत्त होण्यापूर्वी, ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणं, शिक्षण खात्याला भूषणावह ठरलं असतं; आणि तो न मिळताही ते 'आदर्श शिक्षक'च राहिले असते! त्यांच्या कळकळीला... सेवाव्रताला आदरपूर्वक अर्पण.
- माजी विद्यार्थी ,'शि-या'
२२. वेशीपलीकडे -
नव्या पिढीतील त्या युवकांना करमणूकीची अन्य माध्यमं ज्यांना फार काळ भूलवू शकत नाहीत!
सु. शि.
२३. सॉरी सर -
'वॉन्टेड' प्रेमी बेकार तरूणांना
सुहास शिरवळकर
२४. कल्पान्त -
सुनील दत्त के नाम,
यह शख्स अभिनेता है, नेता है,
और इसके बावजूद एक सच्चा इन्सान भी.
२५. समथिंग -
ही कादंबरी मी तुला अर्पण केलीय हे लक्षात येतयं का आपलं... नाहीच?
- सुहास शिरवळकर
२६.अॉब्जेक्शन युवर अॉनर -
सुप्रसिद्ध आंग्ल लेखक श्री. अर्ल स्टँनले गार्डनर ह्यांना ज्यांच्या मानसपुत्रामुळे अमर विश्वास हे पात्र निर्माण झालं
- सुहास शिरवळकर
२७. शेड्स -
कोणत्याही चांगल्या विनोदाला खदखदून दाद देणाऱ्या आणि रहस्यकथांकडे गांभीर्याने पाहणाऱ्या कोणाही रसिक वाचकास.
सु. शि.
२८. काळंबेरं -
माथेरानमधील तीन पावसाळी दिवस रात्रींना...
- सुहास शिरवळकर
२९. गढूळ --
प्रिय मित्र यशवंत रांजणकर ह्यांना
३०. क्षणोक्षणी -
प्रत्येक कादंबरीतील काही तरी आशय आसलाच पाहिजे असं न मानणाऱ्या गोष्टी वेल्हाळ वाचकाला.

३१. जाता येता -
श्रावण ऐन बहरात असताना लोणावळा/ खंडाळ्यास छत्री/ रेनकोट न नेता सहल काढण्याचा उत्साह असणाऱ्या तरूण-तरूणींना
- सुहास शिरवळकर
३२. काटेरी -
त्या समस्तांना, जे पंगूत्वाचा भांडवल न करता स्वयंपूर्ण जगण्याचा प्रयत्न करतात आणि जे मानसिक अपंग नाहीत!
- सुहास शिरवळकर
३३. निदान -
योग्य वेळी एक्झीट घेवून आपल्या नसलेल्या अस्तित्वानेच हूरहूर लावू शकण्याची कला साधलेल्या माणसांना.
- सुहास शिरवळकर
३४. निमित्तमात्र -
असंख्य निमित्तमात्रांना ज्यांना परिस्थितीचं सर्वंकषत्व अनुभवाने पटलं आहे.
३५. झालं-गेलं -
श्री कुमठा शेठ, बॉम्बे बुक डेपो यांना वितरण क्षेत्रातील त्यांच्या निरपेक्ष सज्जन आणि प्रदीर्घ सेवाभावी कारकीर्दीबद्दल आदरपूर्वक!
- सुहास शिरवळकर
३६. सावधान -
वाटेल ते धोके पत्करून प्रेम विवाह करणाऱ्या व हे विवाह यशस्वीपणे जगणाऱ्या जोडप्यांना.
३७. न्याय-अन्याय -
जेफ्री आर्चर नावाच्या मित्राला
३८. इत्यादी इत्यादी -
श्री. संतोष कोल्हे, श्री. सुहास कुलकर्णी, श्री. आनंद अवधानी या 'युनिक्स'ना ज्यांनी माझं हे पहिलं सदर दहा वृत्तपत्रांमधून सिन्डिकेट करण्याचं धाडस केलं.
- सुहास शिरवळकर
३९. फलश्रुती -
मागे वळून पहायला लावणाऱ्या निर्मिती क्षणांना तुमच्यामूळे, हरवलेला कालखंड मला पुनःप्रत्ययाने जगता आला.
- सुहास शिरवळकर
४०. सालम -
अरूण पाटील आणि सतिश तांबे- वाचन /व्यवहारापलीकडील आपल्या मैत्रीला.
- सुहास

४१. सनसनाटी -
तुलासुद्धा भूतकथा वगैरे वाचायला आवडत असतील तर अर्थात !
४२. इन्सानियत -
मा.श्री. राजदत्त उर्फ दत्ताजी ह्यांना सविनय.
४३. थोडक्यात असं -
प्रकाशन प्रवृत्तींना ज्यांनी मला दिवाळीचे दिवस दाखवले, आणि अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्रीही.
- लेखक
४४. क्षण क्षण आयुष्य -
सौ. व श्री. राजेंन्द्र कुलकर्णी जे माझ्या कादंबऱ्या दरवर्षी रसिकतेने प्रसिद्ध करतात.
- सुहास शिरवळकर
४५. बरसात चांदण्यांची -
अभ्यास वगैरे सर्व काही संभाळून 'लफडं' आफेअरमध्ये बदलण्यात यशस्वी होणाऱ्या महाविद्यालयीन युवकांना
- सुहास शिरवळकर
४६. संदेह -
प्रिय मणी उर्फ चिंतामणी लागू- नसलास, तरी तू आहेसच!
- सुशा
४७. कोवळीक -
काकाचं कॅन्टिन...
त्या बाहेरचा बोधि-वृक्ष...
मागची टेकडी...
हॉस्टेलस...
ग्राउन्डचा ओटा...
'वर्ग' सोडून
बी. एम. सी. सी. तल्या सर्व पवित्र स्थळांना,
जिथे मी अज्ञानाचा
सज्ञान झालो!
- सु. शि.
४८. व्रतस्थ -
अशा कोणाही सहृदयास...
आप - पर भाव मनी न डोकावता;
लिंग भेदाच्या मर्यादांपलीकडे
ज्याला कोणत्याही लहान मुलावर
मातृप्रेमाचा वर्षाव सहज करता येतो!
- लेखक
४९. महापर्व --
शब्दांत सारं काही
सांगायचं नसतं
तरीही, सारं काही
सारं काही असतं
तुला काय वाटतं ?
निशब्दालाही
अर्थांचे घुमारे फुटावेत...
निरर्थकही सार्थ व्हावं....
असं,
शब्दांपलीकडलं
काही असतं, का?
काहीच तसं नसतं?
५०. दुनियादारी --
दिग्या, श्रेयस, नितीन, अश्क्या, साईनाथ, शिरिन, मिनू, राणी मां आणि एम. के. दुनियादारीतली ही पात्रं ज्यांच्यामुळे निर्माण झाली त्या कट्टा गँगला.
- सुहास शिरवळकर

५१. स्टार हंटर्स --
त्या सर्व वाचकांना
ज्यांनी अठरा वर्ष पाठपुरावा करून
मला अमर पुन्हा लिहण्यास भाग पाडलं.
- सुहास शिरवळकर
५२. जाई --
कधी एकदा
माझ्यासाठी
पौर्णिमेचा शीतल चंद्रमा
नक्षत्रभरल्या रात्री
चांदण्यांची बरसात
उगवतीचा रक्तिमा
मावळतीचे क्षितिज रंग
नि, सारंच काही
तिष्ठत होतं !
मी साला
माझ्याच नशेत!
अन् आता
मी तिष्ठत आहे,
सीमारेषांवर-
ती स्वप्न - पाखरं
पुन्हा भेटावीत म्हणून !
५३. स्वीकृत --
प्रत्येक स्रीमधील
अनादि - अनंत मातृहृदयाला.
५४. मुक्ती --
प्रेमभंगाचं
दशदिशा व्यापून उरात सलत राहणारं दुःख पचवून
जीवनातल्या प्रखर सत्याला
हसतमुखानं सामो-या जाणाऱ्या
लाखातल्या एकास -
- सुहास शिरवळकर
५५. हृदयस्पर्श --
श्वासाचे अंतर
जन्म आणि मृत्यूत
येताच रडे जो,
जातो तो रडवीत.
या रडण्यांमधले दान
असे आयुष्य ,
आयुष्यचं व्हावे --
सुरेल... सुंदर गीत!
५६. जमीन आसमान --
मराठी ऐतिहासिक वाङ्मयाचे
"आक्षर" जादूगार कै. रणजित देसाई
ह्यांना.
५७. हिंदोस्ता हमारा --
पोलिस खात्यातील त्या धगधगत्या निखा-यांना,
ज्यांच्यामुळे पोलिस- खात्याची
आन - बान व शान टिकून आहे!
- सुहास शिरवळकर
५८. अतर्क्य --
विस्मयमालांमधून पूर्वी प्रसिध्द झालेल्या रहस्यकथांच्या पुनर्मुद्रणाची ही द्वितीयावृत्ती प्रकाशित करायला लावणाऱ्या विस्मयप्रेमी वाचकांना -
- सुहास शिरवळकर
५९. काळंशार --
ही कादंबरी म्हणजे अंध त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था... यांच्या कार्याला वा इतिहासाला वा अडीअडाचणींना वाहिलेली कादंबरी नाही. 'अंधत्व' ही कल्पना येथे पार्श्वभूमीसाठी वापरण्यात आलेली आहे. त्या निमित्ताने, काही अंध, अंधमित्र, अंधसंस्था यांना भेटी दिल्या. हातचं काहीही न राखता या सर्वच संबंधितांनी माहिती पुरविली. तांत्रिक तपशिलासाठी मला या माहितीचा काहीही उपयोग नसला तरी वातावरणनिर्मितीसाठी हे सहाय्य मौल्यवानच ठरलं. किंबहुना, त्यांच्या माहितीशिवाय काही जुजबी ठिकाणी मला ही वातावरणनिर्मिती करताच आली नसती!
म्हणून, "अंध" या ना त्या प्रकारे बांधिलकी असलेल्या सर्वच माणसांना, संस्थांना कृतज्ञतापूर्वक ही कादंबरी अर्पण.
- सुहास शिरवळकर
६०. असो --
या सदराच्या निमित्ताने
वृत्तपत्र व्यवसायातील वाईटांप्रमाणेच
चांगल्या माणसांचाही परिचय झाला;
व्यवसायिकतेच्या गदारोळातही
माणूसपणा जपणा-या या सर्व मित्रांना
- सुहास शिरवळकर

६१. मर्मबंध--
जे, दर नव्याने मनस्ताप देतात,
आणि जे, दर नव्याने अनुभवण्यासाठी
कलाकार सकल अवधानाने निछावर असतो,
ह्या, गाफील व हळव्या क्षणांना
-- सुहास शिरवळकर
६२. हत्यारा--
वाचक,
मुळातच नातं जुळलं नाही
तर तुटण्याचं दुःख जाणवत नाही.
पण जुळलेलं नातं तुटलं तर
होणाऱ्या वेदनेस अंत रहात नाही.
६३. मूर्खांचा पाहुणचार--
चि. प्रबोध यास- त्याच्या वाढत्या गोष्टी वेल्हाळपणाबद्दल .
-- बाबा
६४. प्राक्तन--
श्री. सुरेश देशपांडे ह्यांना---
'प्राक्तन'ची एकत्रित प्रथमावृत्ती छापून
मराठी प्रकाशनाला नवी दिशा दाखवण्याचं
धाडसी कार्य तुम्ही केलंत, म्हणून.....
--- सु. शि.
६५. सत्र--
डॉ विनय हुईलगोळकर-- तुझ्या बरोबरच्या गप्पा - सत्रास!
६६. रूपमती--
आदरणीय पंडित विश्वनाथ शर्मा के नाम
जो वर्तमान में भी
अतित के झरोकों जरिये
रूपमती और बाजबहादूर के साएँ में
जिन्दगी के सारे एशो आराम महसूस करते है!
६७. राजरोस --
लेखकाचं दिसणं, वागणं, बोलणं
आणि
त्याच्या सांपत्तिक परिस्थितीबद्दल
आदरयुक्त गैरसमज बाळगणा-या
वाचकांना !
-- सु.शि.
६८. अंतिम --
लेखकाने तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा म्हणून
कादंबरीचा विषय सांगितला असता,
तोच विषय चोरून, "आपला" म्हणून
लेखनासाठी न वापरणा-या
माझ्या सर्व मददगार मित्रांना ..
-----लेखक

Tuesday, 27 December 2011

सर्व काही वाचनासाठी

सर्व प्रकारच्या वाचनाचा आढावा या ब्लॉगमार्फत घेण्यात येईल व वाचकांना माहिती दिली जाईल